मुंबई. bmc election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार, असा ठाम पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महायुतीत कोणताही संभ्रम नसल्याचे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले. मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. मुंबईत २२७ जागा आहेत. आमचा मित्र पक्ष शिवसेनाच आहे. काही जागा ते लढवतील, काही जागा आम्ही लढवू, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार, अपेक्षा आणि आकांक्षा असतात. प्रत्येक प्रभागात सक्षम आणि चांगले कार्यकर्ते आहेत. मात्र शेवटी काही निवडक लोकांनाच तिकीट देता येते. तिकीट मिळाले अथवा मिळाले नाही, तरीही महायुतीच्या विचारांसाठी आणि विकासाच्या ध्येयासाठी मैदानात उतरायचेच आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महापालिका निवडणुकीपूर्वी रणनीती बैठक-
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील सहा विभागांचा आढावा घेण्यात आला. भाजपच्या विद्यमान नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत मुंबईतील प्रभागनिहाय स्थिती, संघटनात्मक मजबुती, संभाव्य उमेदवार आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. विशेषतः भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटप, स्थानिक समन्वय आणि प्रचाराची दिशा यावर प्राथमिक स्तरावर मंथन करण्यात आले.
महायुतीत कोणताही गोंधळ नाही-
महायुतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही ठिकाणी गैरसमज, चर्चा किंवा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र महायुतीत कोणताही गोंधळ नाही. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्यात येतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यकर्त्यांना थेट संदेश-
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, निवडणूक ही केवळ तिकीटापुरती मर्यादित नसते. “आपण जिंकलो किंवा हरलो, तरी विचार आणि विकासाच्या मार्गावरून मागे हटायचे नाही. मुंबईच्या विकासासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आगामी काळात जागावाटप आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
