मुंबई- Manikrao Kokate Health Update : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईबाबतची अपडेट समोर आली आहे. नाशिक पोलिसांचे पथक अटक वॉरंट घेऊन मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचले आहे. कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या अटकेबाबतची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.
माहितीनुसार, नाशिक पोलिसांचे पथक काल (गुरुवार) रात्री मुंबईत दाखल झाले. सर्वप्रथम हे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पथक थेट लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाले. सध्या पोलिस रुग्णालयात उपस्थित असून पुढील कारवाईबाबत तयारी सुरू आहे.
दरम्यान, कारवाईपूर्वी कोकाटे यांची सध्याची वैद्यकीय स्थिती तपासणे पोलिसांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे नाशिक पोलीस रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. कोकाटेंची प्रकृती, उपचारांची गरज आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊनच अटकेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा -Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार? नाशिक पोलीस आयुक्तांनी मागवली माहिती!
आज कोकाटेंवर अँजिओग्राफी -
आज माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात येणार असून कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणीही होणार आहे. हृदयाशी संबंधित उपचार सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच वैद्यकीय कारणांमुळे कोकाटेंची तात्काळ अटक होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
माहितीनुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या अहवालानुसार थेट अटक शक्य नसेल तर अटक वॉरंट रुग्णालयातच बजावले जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोकाटे यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल.
