Manirao Kokate Resignation: मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी नाशिक कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांसाठी पाठवला आहे.
सभागृहात रमी खेळल्या प्रकरणात अडकल्यापासून चर्चेत आलेले माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती बुधवारी रात्री काढून घेण्यात आली होती. या खात्यांचा पदभार अजित पवारांकडे आहे. त्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. आता माहिती समोर आली आहे की, अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. सवैधानिक कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.
कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असं पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अधिकृतपणे जाईल.
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन… pic.twitter.com/vmba0u3ao4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2025
अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला -
अजित पवार यांनी म्हटले आहे की, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.
संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.
सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.
