मुंबई, Bhagur Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अनेक नगरपालिकांमध्ये धक्कादायक निकाल हाती येत असून नाशिक जिल्ह्यातील भगूर नगरपरिषदेत (Bhagur Nagar Parishad Election Result 2025) मोठी उलथापालथ झाली आहे. सावरकारांच्या भगूरने हिंदुत्वावादी म्हटल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डावललं असून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे.
भगूर नगरपरिषदेत गेल्या 25 वर्षांपासून शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र यंदा भगूरच्या मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्ताबदल घडवून अजित पवारांच्या हातात सत्तेच्या दोऱ्या दिल्या आहेत. शिवसेनेचा हा बालेकिल्ला 25 वर्षींनी ढासळला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत विजयाचे खाते उघडले. येथे राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी विजय मिळवला असून त्यांना भाजपचा पाठिंबा आहे.
भगूर नगरपरिषदेत एकूण 17 जागांवर अजित पवार गट आणि भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना केवळ 3 जागांवर विजयी झाली आहे. या निकालाने भगूरच्या राजकारणातील 25 वर्षांची परंपरा खंडीत झाली असून सत्तांतर झाले आहे. 2017 च्या भगूर जागेसाठी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात, शिवसेनेच्या अनिता करंजकर विजयी झाल्या होत्या.भगूर नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 2 आणि 20 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या 11 जागांसाठी एकूण 53 तर नगरसेवकपदाच्या 264 जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात एकूण 65.94 टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपरिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. त्याचे आज निकाल जाहीर होत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एकूण 1,07,03,576 नोंदणीकृत मतदार आहेत.
