जेएनएन, ठाणे. महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. कुठे उमेदवारांचे पक्षप्रवेश, कुठे युती-आघाडीच्या चर्चा तर कुठे इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत शिंदे गट उमेदवारीसाठी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे.
3,348 अर्ज, महिलांचा लक्षणीय सहभाग!
शिवसेना शिंदे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे.या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी तब्बल 3,348 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये 1,548 महिला इच्छुकांचा समावेश असल्याने महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
जागा किती? इच्छुक चार ते पाच पट
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमधील एकूण नगरसेवकांची संख्या पाहता, इच्छुक उमेदवारांची संख्या ही चार ते पाच पट अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
माहितीनुसार ,प्रत्येक प्रभागात 4 ते 6 इच्छुक आहेत. काही प्रभागांमध्ये 10 पेक्षाही अधिक अर्ज दाखल केले आहे.यामुळे विद्यमान नगरसेवकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
उमेदवारीसाठी कसोटी सुरू
अर्जांची प्राथमिक छाननी पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात मुलाखती आणि स्थानिक पातळीवरील अहवाल तयार करण्यात येणार आहेत. यानंतर अंतिम उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा अधिकार थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे.दरम्यान पक्ष संघटना, सामाजिक काम, मतदारसंघातील पकड, जातीय-सामाजिक समतोल, महिला-युवा प्रतिनिधित्व यांचा विचार करून उमेदवार निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे.
अंतर्गत नाराजीची शक्यता?
इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून समजूत-काढण्याचे आणि समन्वयाचे प्रयत्न केले जाणार असल्याची तयारी करण्यात आली आहे.
शिंदेंचा बालेकिल्ला, पण आव्हानही मोठं
ठाणे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय बळकटीचे केंद्र मानले जाते. मात्र याच बालेकिल्ल्यात उमेदवारीसाठी एवढी गर्दी होणे, हे एकीकडे पक्षाची ताकद दर्शवते, तर दुसरीकडे योग्य समन्वय न साधल्यास अंतर्गत तणाव वाढण्याचे संकेतही आहे.
