जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी आपापले दावे ठामपणे मांडल्याने मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपाने मुंबई महापालिकेतील 102 जागांवर दावा केला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 109 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा जशाच्या तशा ठेवाव्यात, अशी ठाम भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
'त्या' 84 जागांची मागणी
2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना अविभाजित स्वरूपात सर्वाधिक म्हणजे 84 जागा जिंकून आली होती. शिंदे गटाचा दावा आहे की, आजही मुंबईतील अनेक पारंपरिक शिवसेना मतदारसंघांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे त्या जागांवर भाजपाने दावा करू नये, असा आग्रह शिंदे गटाकडून धरला जात आहे.
याउलट भाजपाने गेल्या काही वर्षांत मुंबईत आपली संघटनात्मक ताकद वाढवली असून, लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील यशाचा दाखला देत 102 जागा लढवण्याचा ठाम निर्धार केला आहे.
बैठकीत नेमकं काय घडलं?
18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत सुरुवातीला समन्वयाचे संकेत मिळाले होते. मात्र, जागांची आकडेवारी समोर येताच चर्चा अडचणीत आली.
भाजपाने शहरी मतदारसंघांमध्ये आपली ताकद अधोरेखित केली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) ने मित्रपक्ष म्हणून सन्मानजनक वाटा" मागितला आहे. दोन्ही पक्षांच्या दाव्यांमुळे सुमारे 70 ते 80 जागांवर थेट संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीत तणाव वाढणार?
जागावाटपाचा तिढा सुटला नाही, तर महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत महापालिकेवर सत्ता मिळवणे हे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचे मानले जाते. माहितीनुसार, पुढील बैठकीत वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप होण्याची शक्यता असून, केंद्रीय नेतृत्व किंवा राज्य पातळीवरील नेत्यांकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
