छत्रपती संभाजीनगर: सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असताना भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात FDA च्या पथकाने एका मोठ्या गोदामावर छापा टाकत तब्बल 20 लाख 20 हजार 190 रुपये किमतीचे गायीचे तूप जप्त केले आहे. या तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर तूप विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात असताना झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

सुंदरवाडी परिसरातील गोदामावर FDA चा छापा

माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील सुंदरवाडी परिसरात केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या ‘मेसर्स दिव्य महावितरक’ या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. हे गोदाम विजय कडुबा जाधव यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे. 

या गोदामात पतंजली कंपनीचे गायीचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आले होते. तपासणीदरम्यान या तुपाच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार (FSSAI) कारवाई केली. या कारवाईत एकूण 20 लाख 20 हजार 190 रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त करण्यात आला. 

तुपाच्या गुणवत्तेबाबत संशय, पुढील तपासाकडे लक्ष 

गोदामातील तुपाच्या साठ्याची तपासणी केल्यानंतर FDA अधिकाऱ्यांनी हा साठा ताब्यात घेतला. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत की नाही, तसेच त्याचा अंतिम अहवाल काय येतो, याबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच तुपाच्या गुणवत्तेबाबत आणि त्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता येणार आहे.