जेएनएन, मुंबई. बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल होत आहे. या वादळामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज, सोमवार रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पहाटे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक भागात हातात आलेले पीक आणि जनावरांचा चारा ओला झाला आहे.
अहिल्यानगर, नाशिक, बीड, पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत पावसाची नोंद झाली.
आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
