जेएनएन, पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रकार समोर येत आहेत. खाद्यतेल, मसाले, दूध, तूप आणि पनीरनंतर आता पोळी, भाकरीसह विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठामध्येही भेसळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुदत संपलेले पीठ पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पीठ उत्पादक, पॅकिंग करणारे व्यावसायिक आणि विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिली. ‘दी पूना मर्चेंट्स चेंबर’च्या लाडू-चिवडा विक्री केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढते. याच संधीचा फायदा घेत काही उत्पादक आणि विक्रेते अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता पिठाच्या विक्रीवरही प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. 

मुदतबाह्य पीठ पुन्हा बाजारात आणल्याची माहिती 

राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये पॅकिंग करून विक्री करण्यात येणाऱ्या पिठामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. त्याचबरोबर मुदत संपलेले पीठ पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात अशा प्रकारांना चालना मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने तपासणीचे आदेश दिले आहेत. 

या मोहिमेंतर्गत पिठाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, पॅकिंग युनिट, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांकडील साठ्याची तपासणी केली जाणार आहे. पिठाची उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम मुदत, पॅकिंगवरील माहिती आणि उत्पादनाची गुणवत्ता यांची पडताळणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. 

खाद्यतेल आणि मसाल्यांवरही FDA ची नजर 

    दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल आणि मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. राज्यभरात एक हजारांहून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे 28 हजार क्विंटल खाद्यतेल आणि 18 ते 20 हजार क्विंटल मसाले जप्त करण्यात आल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

    खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये भेसळ करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. त्यामुळे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. 

    भेसळखोरांविरोधात कारवाईचा बडगा 

    गेल्या काही महिन्यांपासून राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करणारे उत्पादक आणि त्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात एफडीएकडून तपासणी व कारवाई केली जात आहे. दूध, तूप, पनीर, खाद्यतेल, मसाले आणि गूळ अशा विविध पदार्थांनंतर आता पिठाच्या गुणवत्तेचीही तपासणी केली जाणार आहे. 

    दिवाळीच्या काळात लाडू, चिवडा, चकली, करंजी यांसह विविध फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पीठ आणि इतर खाद्यपदार्थ वापरले जातात. त्यामुळे ग्राहकांनी पीठ किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकिंगवरील उत्पादन तारीख, अंतिम मुदत आणि उत्पादकाची माहिती तपासावी. संशयास्पद किंवा मुदतबाह्य पदार्थांची विक्री आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.