बीड. Santosh Deshmukh murder case :जिल्ह्यातील मस्साजोग गावचे रहिवासी  व सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज विशेष मकोका (MCOCA) न्यायालयात पार पडणार असून, मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.

या हत्येप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांची हत्या पूर्वनियोजित कटातून करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान संघटित गुन्हेगारीचा स्पष्ट संदर्भ समोर आल्याने आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने यापूर्वी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आजच्या सुनावणीत आरोप निश्चित झाले तर पुढील टप्प्यात साक्षी-पुराव्यांची सुनावणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळणार का, आरोपींना कठोर शिक्षा होणार का, याबाबत आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष मकोका न्यायालय आज कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.