Nagar Parishad Election Results 2025 : राज्यात 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी निकाल जाहीर झाले आहे. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. मात्र या सर्वात नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिका निवडणुकीचा निकाल राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण घराणेशाहीवरून काँग्रेस व अन्य पक्षांवर टीकेची झोड उडवणाऱ्या व घराणेशाहू संपवू म्हणणाऱ्या भाजपला घराणेशाहीचा फटका बसला आहे. येथे मतदारानांनी भाजपला सपशेल नाकारले असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सर्व सहा उमेदवारांचा पराभव झाला आहे.
भाजपने एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्यांनी तिकीट दिली होती. मात्र या निवडणुकीत मतदारांनी भाजपचा पार धुव्वा उडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत 17 जागांवर विजय मिळवला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुशल नेतृत्वाने भाजपला चारी मुंड्या चीत केले आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणि काँग्रेसला प्रत्येकी 1-1 जागा मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या होत्या. त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अतूल सावे, पंकजा मुंडे आदि दिग्गजांच्या सभा, कॉर्नर सभा झाल्या होत्या.
मतदारांनी भाजपला जमिनीवर आणलं -
भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती तर नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग 7 अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग 1 अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग 8 अ), मेव्हणा युवराज वाघमारे (प्रभाग 7 ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग 3) या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, मतदारांनी या सर्व उमेदवारांना चांगलेच आपटून भाजपला धडा दिला आहे. लोहा नगरपरिषदेतील भाजपच्या या पराभवामुळे स्थानिक राजकारणात या निकालाने मोठी चर्चा रंगली आहे.
