जेएनएन, मुंबई: MPSC JMFCS Merit List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 (जेएमएफसी) ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत बीडमधील ऋचा कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे.

343 उमेदवारांची मुलाखतींसाठी झाली होती निवड

मागील काळात कोरोनामुळे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 ची परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनानंतर 9 सप्टेंबर 2023 ला परीक्षा घेण्यात आली. तीची मुख्य परीक्षा 24 ऑगस्ट 2024 ला झाली. त्यानंतर 343 उमेदवारांची मुलाखतींसाठी निवड झाली होती. दिनांक 17 ते 29 मार्च या काळात परीक्षेच्या मुलाखती पार पडल्या.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

त्यानंतर 29 मार्च रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात 114 जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी तात्पुरती निवड झाल्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. अंतिम निवडयादी लवकरच एमपीएससी जाहीर करणार आहे.

    एलएलबीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले

    पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. एलएलबीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवले. अ‍ॅड. गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन, आई-वडील व आजी यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया ऋचाने दिली आहे.

    पहिल्या 10 मध्ये 9 मुली

    बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले आहे. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. सायली संपत झांबरे द्वितीय, किरण संभाजी मुळीक ही तिसरी आली. तसंच, या निकालात पहिल्या दहा टॉपर्समध्ये नऊ मुलींचा समावेश आहे, यामध्ये शिवाणी रामनाथ फाडोळ, तन्वी रहेमान शेख, सोनिया अविनाश गंधले, तनुज रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथराव गुंजाळ, अनिकेत लिंबाराव कोकरे आदींचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.