एजन्सी, पुणे. Pune News: बेंगळूरुमध्ये पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरल्याचा आरोप असलेला एक व्यक्ती सातारा जिल्ह्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. 

आरोपी राकेश खेडेकर याने विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय आहे आणि तो साताऱ्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर आढळला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याला शिरवळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुण्यातील एका खाजगी वैद्यकीय सुविधेमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूरु पोलिसांचे एक पथक राकेश खेडेकरला ताब्यात घेण्यासाठी पुण्यात आहे. बेंगळूरु पोलिसांनी यापूर्वी राकेशची पत्नी गौरी खेडेकर (32) हिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत जप्त केला होता.

"गुरुवारी रात्री आम्ही एका व्यक्तीला रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. त्याने नंतर आम्हाला सांगितले की त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांना माहिती देईपर्यंत, बेंगळूरुमधील हत्येची बातमी समोर आली होती," असे शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले.

बेंगळूरु पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे राहत असलेल्या घराच्या मालकाने गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला. हे जोडपे गेल्या महिन्यात बेंगळूरुला आले होते आणि हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली गावात एका फ्लॅटमध्ये राहत होते, असे पोलीस उपायुक्त (डी.सी.पी.) सारा फातिमा यांनी सांगितले.

    राकेशने गुरूवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास त्याच्या घर मालकाला फोन केला होता. काल रात्री मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि शहर सोडून चाललोय असं त्याने घर मालकाला सांगितले. त्याशिवाय पोलिसांना हे सांगा आणि तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कळवा असंही आरोपीने घरमालकाला म्हटलं.

    सूटकेसमध्ये भरलेल्या महिलेच्या शरीरावर अनेक वार होते, असे त्यांनी सांगितले. गौरीने मास मीडियामध्ये पदवी पूर्ण केली होती, तर तिचा पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि घरून काम करत होता, असे पोलिसांनी सांगितले.