जेएनएन, बीड: बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्याविरोधात तब्बल साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा चकलांबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण!
तक्रारदार भरत नवनाथ खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार —
2016 मध्ये धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष यांनी खेडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खेडकर यांना सांगितले की, “तुम्हाला शेततलावाच्या दुरुस्तीचे सरकारी टेंडर मिळवून देतो. आपण पार्टनरशिपमध्ये हे काम करूया.” या आश्वासनावर विश्वास ठेवून खेडकर यांनी त्यांच्याकडे 13.5 लाख रुपये दिले. मात्र आतापर्यंत ना टेंडर मिळाले, ना पैसे परत मिळाले. वारंवार पाठपुरावा करूनही धसे पिता–पुत्रांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी खेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई
खेडकर यांच्या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात धसे पिता–पुत्रांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे .