हिंगोली - मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मागील एक महिन्यापासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

हिंगोली जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार 58 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दोन पिकांवर शेतकऱ्यांचा मुख्य भर असल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हळदीलाही फटका-

कापूस आणि सोयाबीन यांच्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

जनावरेही दगावली -

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 40 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची दूधाळ व शेतीकाम करणारी जनावरे वाहून गेली आहेत. यात काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच एका शेतकऱ्यासह इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये लोकांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे.

    सरकारकडून पंचनामे सुरू -

    प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानीची आकडेवारी जमा करण्यात आली आहे. सोयाबीन आणि कापूस या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर केला आहे.