जेएनएन, हिंगोली. Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अकोली येथे एका  35 वर्षीय शेतकऱ्यांने सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या ओझ्याला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Hingoli Farmer Suicide) केली आहे. या हृदयद्रावक घटनेने अकोली गावात शोककळा पसरली आहे.  मानिक दत्तराव कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विषारी औषध सेवन करून संपविले आयुष्य

मानिक कदम हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर अवलंबून होता. गेल्या काही हंगामांपासून पावसाचा अनियमितपणा, नापिकी, उत्पादनातील घट आणि वाढत्या कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्येतून त्यांनी सोमवारी रात्री विषारी औषध सेवन करून आपले आयुष्य संपविले. 

कुटुंबियांनी तत्काळ त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेची नोंद वसमत पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला

मानिक कदम यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. या अचानक घटनेने संपूर्ण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, “मानिक गेल्या काही दिवसांपासून अतिशय चिंतेत होता. शेतीचा खर्च भागत नव्हता, कर्जाचा बोजा वाढत चालला होता. मदतीचा कोणताही आधार न मिळाल्याने त्यांनी अखेर हे टोकाचे पाऊल उचलले.” 

    अन्याय थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना 

    स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. दरवर्षी शेकडो शेतकरी कर्ज आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकून आत्महत्या करतात, पण शासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जातात. हा अन्याय थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहे असे मत स्थानिकानी व्यक्त केले. दरम्यान, तहसीलदार आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्यता योजनेअंतर्गत मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.