जेएनएन, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘मुक्ताई बंगला’ या निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरमधील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली होती.
सोने-नगदी रक्कम आणि मौल्यवान कागदपत्रे चोरीला
माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंगला परिसरात प्रवेश करत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी तळमजल्यावरील तसेच पहिल्या मजल्यावरील काही खोल्यांमध्ये प्रवेश करून कपाटे फोडली आणि आतील वस्तूंची चोरी केली. नेमकं किती मुद्देमाल चोरीस गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पंचनामा सुरू असून सोने-नगदी रक्कम आणि मौल्यवान कागदपत्रे चोरीला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल
सकाळी साफसफाईसाठी आलेल्या कामगारांच्या नजरेस दरवाज्याचे कुलूप तोडलेले आणि कपाटे अस्ताव्यस्त दिसल्याने हा प्रकार उघड झाला. कामगाराने तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी सुरू केली.
पोलिसांनी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावले असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. परिसरातील काही ठिकाणच्या कॅमेऱ्यांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अगदी काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा खडसे कुटुंबाच्या निवासस्थानी झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे सध्या जळगावबाहेर असून घटनेची माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. पोलिसांना घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
