हिंगोली - जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच वसमत तालुक्यात भूकंपाचे हलके धक्के नोंदवले गेले होते. त्यानंतर पुन्हा औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. औंढा तालुक्यात सकाळच्या सुमारास अचानक भूकंप जाणवल्याने गावकऱ्यांनी घराबाहेर धाव घेतली. काही सेकंद जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील अनेकांनी घरांच्या भिंतींना कंपन जाणवल्याची माहिती दिली आहे. अलीकडच्या काळातील भूकंपांची मालिकाच सुरू झाली आहे. याआधी वसमत तालुक्यातही दोन-तीन दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. सलग दोन तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसत असल्याने जिल्ह्यात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण-
सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा घरांचे नुकसान झाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, हादरे जाणवल्याने महिलांमध्ये,लहान मुलांमध्ये,वृद्धांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. सलग काही दिवसांपासून दोन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये भूकंप जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी प्रशासनाकडून तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शनाची मागणी केली आहे.
प्रशासन सतर्क-
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित भागातील नागरिकांशी संपर्क साधला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू यासंदर्भात भूगर्भ विभागाचा अहवाल येणे बाकी आहे.
