छत्रपती संभाजीनगर, (एजन्सी) - बीड जिल्ह्यात एका पुरात कार वाहून गेल्याने चार जण पाण्यात अडकले होते. त्यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी मध्यरात्री परळीतील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावर ही घटना घडली.
परळी येथील एका लग्न समारंभाला उपस्थित राहून चार जण दिग्रसला परतत होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांची कार पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून नाल्यात वाहून गेली.
सूचना मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षांत दहिफळे आणि स्टेशन हाऊस ऑफिसर उत्तरेश्वर केदार स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांना एका व्यक्ती नदीच्या काठावर आढळला. नदीला पावसामुळे पूर आलेला आहे.. दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्यात यश आले आहे, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्यानंतर त्यांना नदीच्या पलीकडून मदतीसाठी ओरडणाऱ्या इतर दोन व्यक्तींचे आवाज ऐकू आले, जे त्या ठिकाणापासून सुमारे 300 मीटर अंतरावर अडकले होते आणि त्यांनाही वाचवण्यात आले.
विशाल बल्लाळ या कारमधील चौथ्या प्रवाशाला वाचवता आले नाही आणि नंतर त्याचा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सांगितले.