जेएनएन, मुंबई. Mumbai Rain Update : मुंबई व उपनगरात सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चक्का जाम झाला असून अनेक भागात पाणी साचले आहे. तिन्ही मार्गावरील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने काही भागात सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केले आहे. कोकण विभाग, पनवेल या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा यांना दिनांक आज (मंगळवार) सुट्टी जाहीर केलेली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी गर्दीच्या वेळेसच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. तिन्ही लोकल मार्गावरील वाहतूक अंदाजे 30 ते 50 मिनिटे विलंबाने सुरू आहे. सोमवारपासून लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारी व खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर -

सरकारने महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने आज (मंगळवार) मुंबई व उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी केला असून सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या -

मुंबई विद्यापीठाकडून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता विद्यार्थीहित व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या 19 ऑगस्टच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या  आहेत. आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 ला होणार आहेत.

    असे आहेत विभाग आणि विषय!

    बीपीएड सत्र 2, बीफार्म सत्र 2, एमफार्म सत्र 2, एमएड सत्र 2, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र 4, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स),मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नेलिझम सत्र 3, पीआर सत्र 3, टेलेव्हिजन स्टडीज सत्र 3, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र 3, फिल्म स्टडीज सत्र 3, एमपीएड सत्र 2,  यांच्यासह अनेक परीक्षांचा समावेश आहे.