जेएनएन, बीड: ‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली असून, या निमित्तानं बीडकरांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
नवा विक्रम रचला
या कामासाठी सरकारमार्फत 990 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
दिवाळीपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याला हक्काचे घर मिळाले
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे. बीड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांनी यंदाची दिवाळी आपल्या नव्या घरकुलात साजरी केली, हीच या योजनेची खरी यशोगाथा आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखविलेली समर्पणभावना, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हेच या योजनेच्या यशस्वीतेचे रहस्य आहे. काटेकोर नियोजन, दैनंदिन देखरेख आणि टीमवर्कचा हा विजय आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने विकसीत केलेल्या ‘पीएमएवाय (सॉफ्ट) ॲप’चा मोठा वाटा आहे. या ॲपद्वारे प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट प्रभागाची जबाबदारी देण्यात आली होती. लाभार्थ्यांशी सतत संपर्क ठेवून बांधकाम सुरू ठेवण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. सूक्ष्म नियोजन, दैनंदिन पाठपुरावा आणि निधीचे वेळेत वितरण या त्रिसूत्रीमुळेच हे उद्दिष्ट चार महिन्यांत पूर्ण करणे शक्य झाले. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांधकामासाठी वाळू उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय व बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा वेळेवर पुरविण्यात आल्या.
ग्रामीण गृहनिर्माण हा शासनाचा प्राधान्याचा विषय असून, राज्य व केंद्र पुरस्कृत या योजनांना बीड जिल्ह्यात विशेष गती देण्यात आली. शाश्वत विकासाच्या ध्येयाशी निगडित या उपक्रमात “दिवाळीपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याला हक्काचे घर मिळावे” या उद्देशाने नियोजन करण्यात आले. बीड जिल्ह्याची स्थलांतराची पार्श्वभूमी लक्षात घेता, ऊसतोडीपूर्वीच कुटुंबांना घर मिळावे या दृष्टीने कामांना वेग देण्यात आला. परिणामी, हजारो कुटुंबांना या दिवाळीत नवीन घराचा आनंद लाभला आहे.
ठळक वैशिष्ट्ये :-
- बीड जिल्ह्यात “दिवाळी नवीन घरकुलात” उपक्रमांतर्गत 50 हजारांहून अधिक घरकुल पूर्ण
 - सरकारमार्फत 990 कोटी निधी वितरित
 - बीड जिल्हा महाराष्ट्रात प्रथम
 - चार महिन्यांत 40 हजार घरकुले पूर्ण
 - काटेकोर नियोजन आणि दैनंदिन पाठपुराव्यामुळे यश
 - महाराष्ट्राला अधिक उद्दिष्ट मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य सरकारतर्फे आभार
 - प्रत्येक पात्र कुटुंबाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी योजना अधिक वेगाने राबविणार
 
हेही वाचा - Maharashtra Politics: महायुतीच्या आमदारांना दिवाळी भेट; प्रत्येकी 2 कोटींचा विकासनिधी वाटप
