जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांना दिवाळी भेट दिली आहे. मंत्री शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी 2 कोटींचा निधी मंजूर करून वितरित केला आहे.
सामाजिक विकासासाठी निधी
सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. ही योजना राज्यातील लोकप्रिय योजनांपैकी एक असून, आमदार, खासदार, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो.
प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांना 2 कोटींचा निधी मंजूर
गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती. उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, मंत्री शिरसाट यांनी प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांना 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
दिवाळीपूर्वी हा निधी वितरित झाल्याने आमदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयामुळे दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.