Shivajirao Kardile Death: राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 67 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले आहे. आमदार कर्डिले यांना पहाटे त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगर-नेवासा आणि राहुरी मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. ते सहाव्यांदा आमदार होते.
अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.
— जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर (@InfoAhilyanagar) October 17, 2025
भावपूर्ण श्रद्धांजली ! pic.twitter.com/ivBLRSxHD0
शिवाजी कर्डिले यांनी बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात करत आमदार व मंत्रीपदापर्यंत यश मिळवले. त्यांचा दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.
शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास-
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. नगर शहराजवळील बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षातून त्यांनी काम केले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2024 मध्ये त्यांनी राहुरीतून भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख… pic.twitter.com/IKXzPNmG8t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 17, 2025
रोहित पवारांकडून शोक व्यक्त-
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली, असे त्यांनी म्हटले आहे.