जेएनएन, मुंबई: मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत मुंबई मरीना’ (Viksit Bharat Mumbai Marina) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 887 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, मुंबईच्या सागरी पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत नौवहन, सागरी पर्यटन आणि मनोरंजन केंद्रे विकसित केली जाणार आहेत. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून मुंबईला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे. या मरीनामध्ये आधुनिक बोट जेटी, यॉट मरीना, जलपर्यटन सुविधा, मनोरंजन व विरंगुळ्याची केंद्रे उभारली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याने या प्रकल्पाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र सरकारच्या मते, हा निर्णय पूर्णपणे विकासाभिमुख असून मुंबईच्या दीर्घकालीन आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळणार
या प्रकल्पाबाबत केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ‘विकसित भारत मुंबई मरीना’ प्रकल्पामुळे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. नौवहन, बंदर आणि सागरी पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
समुद्रकिनाऱ्याचा अधिक चांगला अनुभव घेता येणार
या प्रकल्पामुळे खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार, तसेच मोठ्या प्रमाणात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. किनारपट्टी भागाचा नियोजनबद्ध विकास करून तो सार्वजनिक वापरासाठी खुला केला जाणार असल्याने मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्याचा अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे.
