जेएनएन, कल्याण: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार
सुभाष भोईर हे कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रभावी नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठी ताकद ठरणार आहे.
उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) साठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पक्षातील नाराजी, अंतर्गत असंतोष आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक प्रश्नांमुळे हा प्रवेश होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भोईर यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना UBTच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
भाजपची ताकद वाढणार
भाजपकडून सुभाष भोईर यांच्या प्रवेशाकडे महत्त्वाच्या राजकीय यश म्हणून पाहिले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकारण तापण्याची चिन्हे आहे.
