जेएनएन, मुंबई Maharashtra Municipal Election 2026 : राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. आजपासून  उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आज पहिल्याच दिवशी मोठी लगबग पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अर्ज भरण्याचा कालावधी-

निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 असा असणार आहे. या कालावधीत उमेदवारांना संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले नामनिर्देशन अर्ज सादर करावे लागणार आहेत.

छाननी आणि माघार-

दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजीच केली जाणार आहे. छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची संधी दिली जाणार आहे. या टप्प्यावर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं आणि युती-अघाड्यांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चिन्ह वाटप आणि अंतिम यादी-

    उमेदवारी अर्ज माघारीनंतर 3 जानेवारी 2026 रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.

    मतदान आणि निकाल-

    महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच राज्यातील प्रमुख शहरांचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

    राजकीय वातावरण तापलं!

    महानगरपालिका निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवसापासून जोरदार हालचाली, शक्तीप्रदर्शन आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं आहेत.