जेएनएन, मुंबई. BMC Election Latest News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी अधिकृतपणे युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. या युतीचा थेट फायदा मुंबईतील तब्बल 67 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांना होणार असल्याचं विधानसभा निवडणुकीतील प्रभागनिहाय मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

विधानसभा निकालांचा मनपा गणितावर परिणाम

अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदानाचा अभ्यास केल्यास, मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये मनसे आणि शिवसेना (UBT) यांची एकत्रित मते मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून आले आहे. या 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते, तर 28 प्रभागांत महायुतीचे उमेदवार पुढे होते. मात्र मनसे आणि ठाकरे गटाची मते एकत्र आल्यास अनेक ठिकाणी महायुतीला थेट आव्हान निर्माण होणार आहे. 

माहीम, वरळी, दिंडोशी ठरले निर्णायक

माहीम विधानसभा मतदारसंघात झालेली तिरंगी लढत झाली होती.अमित ठाकरे (मनसे), महेश सावंत (शिवसेना UBT) आणि सदा सरवणकर (शिंदे गट) यांच्यात लढत झाली होती.

विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 191 आणि 192 मध्ये सदा सरवणकरांनी मिळवलेल्या मतांपेक्षा मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज जवळपास दुप्पट होती. हे आकडे मनपा निवडणुकीत युती किती निर्णायक ठरणार आहे. 

    याच आधारावर वरळी आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्रांतील अनेक प्रभागांमध्येही मनसे–शिवसेना (UBT) यांची एकत्रित मते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक असल्याचं चित्र आहे. 

    मराठीबहुल पट्ट्यात ताकद वाढणार

    वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप अशा मराठीबहुल परिसरात ही युती विशेष प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतविभागणीमुळे नुकसान झालेल्या या दोन्ही पक्षांना युतीमुळे थेट फायदा होणार असून, मराठी मतांचे एकत्रीकरण हे महत्त्वाचं फॅक्टर ठरणार आहे. 

    • नामनिर्देशन दाखल - 23 डिसेंबर 2025
    • नामनिर्देशन अंतिम तारीख- 30 डिसेंबर 2025
    • छाननी - 31 डिसेंबर 2025
    • नामनिर्देशन वापस - 2 जानेवारी 2026
    • निवडणूक चिन्ह - 3 जानेवारी 2026
    • मतदान - 15 जानेवारी 2026
    • मतमोजणी - 16 जानेवारी 2026

    हेही वाचा - Civic Polls 2026: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, पुन्हा तारीख बदलली