जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना मोठा धक्का बसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील दोन जागांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे–राज ठाकरे) यांच्यातील आघाडीबाबतची चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, मनसेच्या वाट्याला गेलेल्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हव्या आहेत. मात्र या जागा सोडण्यास मनसेकडून ठाम नकार देण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे. या दोन जागांवरूनच सध्या संपूर्ण आघाडीचे गणित अडकल्याचे बोलले जात आहे.
दोन जागांवरून सगळा खेळ अडला
मुंबई महापालिकेतील जागावाटपाच्या चर्चेत ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 12 ते 13 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. इतकेच नव्हे तर स्वतःला फारशा अनुकूल नसलेल्या किंवा नको असलेल्या काही जागाही राष्ट्रवादीला देण्यास ठाकरे बंधू तयार असल्याची माहिती आहे. मात्र मनसेच्या कोट्यातील दोन जागांवर राष्ट्रवादी पक्षाचा आग्रह आणि मनसेची माघार न घेण्याची भूमिका यामुळे वातावरण ताणले गेले आहे.
माहितीनुसार, या दोन जागांचा प्रश्न जर वरिष्ठ पातळीवर मिटवण्यात आला, तरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे. अन्यथा मुंबईतील आघाडीचे चित्र बदलू शकते.
राष्ट्रवादीची काँग्रेससोबत चाचपणी
दरम्यान, ठाकरे बंधूंशी चर्चा अडकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईत काँग्रेससोबत जाण्याची चाचपणी सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला किती आणि कोणत्या जागा मिळू शकतात, याबाबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे–पवार–मनसे या संभाव्य समीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान
मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडीकरिता प्रतिष्ठेची मानली जाते. मात्र जागावाटपातील मतभेद, स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवार आणि पक्षांतर्गत दबाव यामुळे आघाडीची एकजूट टिकवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. दोन जागांचा प्रश्न सध्या छोटा वाटत असला, तरी त्याचे राजकीय परिणाम मोठे ठरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: BMC Eections: ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस–शिंदे यांची रात्रीस बैठक, उर्वरित जागेचा तिढा सोडविला
