जेएनएन, धाराशिव. राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. पेपरफुटी करणाऱ्यांना वाचवण्यासाठी पैशाला महत्त्व दिले जात असून या प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध असल्याचा संशय जाणवत आहे, असा धक्कादायक आरोप रोहित पवार यांनी केला.
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर रोहित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथे जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
आतापर्यंत 15 पेपर फुटल्याचा आरोप
राज्यात वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र, सरकार या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
“आतापर्यंत 15 पेपर फुटले आहेत. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भविष्याशी सरकारला काहीही देणेघेणे नसल्यासारखी परिस्थिती आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पेपरफुटीच्या घटनांमागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. “पैशाला महत्त्व देऊन पेपरफुटी करणाऱ्यांना वाचवले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध असल्याचा संशय निर्माण होतो,” असे अशी टीका पवार यांनी केली.
‘आमदार फोडण्यात सरकार व्यस्त’
राज्यातील राजकीय परिस्थितीवरही रोहित पवार यांनी टीका केली. सत्ताधारी व्यवस्था जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय समीकरणे जुळवण्यात अधिक व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
“पैसे देऊन आमदार फोडा, खासदार फोडा आणि जनतेला वाऱ्यावर सोडा, अशी सध्याची परिस्थिती झाली आहे,” असा घणाघात त्यांनी सरकारवर केला. राज्यात शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात असताना सरकारचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
शेतकरी-मजुरांच्या मुलांचे भविष्य धोक्यात
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि मजूर कुटुंबातील मुलांचा समावेश असल्याचे सांगत रोहित पवार यांनी सरकारने त्यांच्या भविष्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज व्यक्त केली.
“आज शेतकरी आणि मजुरांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या कष्टातून शिकणारी मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, पेपरफुटीसारख्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. सरकारचे याकडे लक्ष नाही,” असे रोहित पवार म्हणाले.
प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येच्या घटनेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांकडून होत आहे.
