जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडन येथे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लंडन येथील ऐतिहासिक महाराष्ट्र मंडळातर्फे शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र भवनात ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.

‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये
लंडनच्या धरतीवरून एकनाथ शिंदे यांनी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

‘सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आणि मी खंबीरपणे उभा आहे,’ असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक योगदानाबद्दल गौरव
लंडनमधील महाराष्ट्र भवनात यावेळी वातावरण मराठीमय झाले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र मंडळाने आपला गौरव केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी लंडनस्थित मराठी बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

महाराष्ट्र आणि लंडनचे जुने नाते
महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचा लंडनशी जुना संबंध राहिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लंडनशी संबंध आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील वास्तव्याच्या ठिकाणाचे स्मारक महाराष्ट्र सरकारने विकसित केले आहे.

    लंडनमधील बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या ठिकाणी भेट देत शिंदे यांनी तेथे नतमस्तक झाले. यावेळी बाबासाहेबांनी लिहिलेल्या अद्वितीय संविधानामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करण्याची संधी मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.