जेएनएन, नांदेड. नांदेडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील श्रीनगर परिसरातील शाळेत 10 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या आरोपावरून 50 वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मुलीने आरडाओरड केल्यानंतर…
माहितीनुसार, शाळेत असताना संबंधित मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली माहिती
घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी काल रात्री संशयित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल
त्याच्यावर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे.
