डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. Tsunami in Japan : रशियाच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर बुधवारी पहाटे 8.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जपान, अमेरिकेसह संपूर्ण पॅसिफिक परिसराला सुनामीचा ( Tsunami) अलर्ट देण्यात आला आहे
हा भूकंप इतका शक्तिशाली होता की अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड, फिलीपिन्स, इक्वेडोर आणि हवाई सारख्या भागातील समुद्रकिनाऱ्यांवर धोक्याची घंटा वाजत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, १९५२ नंतर या प्रदेशातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
आज दिवसभरात कामचटकाच्या किनाऱ्यावर किमान सहा भूकंपांचे धक्के जाणवले. ज्यांची तीव्रता 5.4 ते 6.9 पर्यंत होती. तथापि, हे सर्व 8.7 रिश्टर स्केलच्या भूकंपापेक्षा कमी शक्तिशाली होते. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिला आहे की रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात 3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.
ट्रम्प म्हणाले - जपान देखील धोक्यात -
सुनामीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, पॅसिफिक महासागरात झालेल्या मोठ्या भूकंपामुळे, हवाईमध्ये राहणाऱ्यांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर त्सुनामीचे निरीक्षण सुरू आहे. जपानलाही धोका आहे. खंबीर राहा आणि सुरक्षित राहा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सुनामीच्या धोक्यामुळे अनेक देश भीतीच्या छायेत-
हवाईमध्ये त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर, होनोलुलुमध्ये सायरन वाजवण्यात आले आणि लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. केंद्राने म्हटले आहे की 1 ते 3 मीटर उंचीच्या लाटा हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांवर धडकू शकतात.
जपानने टोकियो खाडीसह अनेक भागात सुनामीचा इशाराही जारी केला आहे. न्यूझीलंडमध्ये, आपत्ती व्यवस्थापन संस्थेने किनारी भागात मोठ्या लाटा धडकण्याचा इशारा दिला आहे, मात्र तेथे अद्याप स्थलांतराची आवश्यकता नाही.
फिलीपिन्समध्ये, भूकंपशास्त्रीय एजन्सी PHIVOLCS ने प्रशांत महासागराला लागून असलेल्या किनारी भागातील लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. येथे एक मीटरपेक्षा कमी उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ग्वाम आणि अलास्काच्या काही भागात त्सुनामी वॉच देखील जारी करण्यात आला आहे.
इक्वेडोर आणि अलास्कामध्येही सुनामीचा धोका-
अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण अलास्का आणि अलास्का द्वीपकल्पासाठी त्सुनामीचा सल्ला जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने कॅलिफोर्निया-मेक्सिको सीमेपासून अलास्कातील चिग्निक खाडीपर्यंत त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. दुसरीकडे, इक्वेडोरलाही सुनामीचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे, जिथे 3 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धोका निर्माण करू शकतात.
रशियाच्या भूभौतिक सेवेच्या प्रादेशिक विभागाने या भूकंपाचे वर्णन 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप म्हणून केले आहे. कामचटकातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीच्या आग्नेयेस झालेल्या या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक प्रदेशाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
इंडोनेशियातही सुनामीचा इशारा -
रशियाजवळ 8.7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानंतर इंडोनेशियाच्या भूभौतिकशास्त्र संस्थेने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. बुधवारी दुपारी 0.5 मीटरपेक्षा कमी उंचीच्या लाटा इंडोनेशियाच्या काही भागात धडकू शकतात, असा इशारा संस्थेने दिला आहे. पापुआ प्रदेश, उत्तर मालुकू आणि गोरोंतालो प्रांतातील किनारी भाग प्रभावित होऊ शकतात, असे एजन्सीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन -
त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, अनेक देशांमधील लोक समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला पाळत आहेत. हवाईमध्ये लोक उंच ठिकाणी स्थलांतरित होत आहेत, तर न्यूझीलंडमध्ये, किनारी भागातील लोकांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
जपानमध्येही, टोकियो खाडी आणि इतर किनारी भागातील लोक सतर्क आहेत. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना शांत राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.