जेएनएन मुंबई - गोरेगावमधील एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात हेमलता बाणे (39) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (33) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. यातील हेमलता बाणे ही मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी डान्सर असल्याने हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे.
हेमलता बाणे-पाटकर हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठं काय करते’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची ती सून असल्याचं सांगितलं जात आहे.
हेमलताला खंडणी प्रकरणात अटक केल्यानंतर अर्चना पाटकर देखील चर्चेत आल्या. आता त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. माझा मुलगा हेमलता बाणेपासून 4 वर्षांपूर्वी विभक्त झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाशी आमचा काहीच संबंध नाही. दोघांच्या घटस्फोटाचा खटला देखील न्यायालयात सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोस्टमध्ये अर्चना पाटकर यांनी लिहिलंय ?
अर्चना पाटकर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली 40 वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटींच्या खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत.
मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झालाय. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद- अर्चना पाटकर.
काय आहे प्रकरण?
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अंधेरीतील एका आलिशान हॉटेलमध्ये गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी ते लेझर लाईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होता. यावरून हेमलता पाटकर आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी यांचा बिल्डरच्या मुलाशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
यानंतर हेमलता आणि अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली. तडजोड होऊन हा आकडा पाच कोटींवर ठरला. पण, हा पैसे उकळण्याचा प्रकार असल्याचे लक्षात येताच बिल्डरने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला आणि दीड कोटींचा पहिला हप्ता स्वीकारताना या दोघींना रंगेहाथ पकडले.
