जेएनएन, मुंबई. Maharashtra Board 10th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 58 हजार 020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 च्या परीक्षेस 'श्रेणीसुधार/गुणसुधार' साठी तीन संधी देण्यात येत आहेत.   

एक वा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील. सदर सुविधेचा लाभ घेण्यासाठी 34,393 विद्यार्थी पात्र आहेत.   

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.   

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवार, 14/05/2025 ते बुधवार, 28/05/2025 पर्यंत आहे. प्रति विषय रू. 50/- शुल्क आहे.   

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरुन, हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. अर्ज करण्याची मुदत बुधवार,14/05/2025 ते बुधवार, 28/05/2025 पर्यंत आहे. प्रति विषय रू. 400/- शुल्क आहे.

    उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. प्रति विषय रु. 300/- शुल्क आहे.   

    विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे आठ दिवस कार्यरत राहील.