नवी दिल्ली. GST Council Meeting: नवीन जीएसटी दर जाहीर झाले आहेत आणि आता दैनंदिन वापराच्या 90 टक्के वस्तू स्वस्त होतील. विशेष म्हणजे सामान्य माणसासोबतच सरकारने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे (Big Relief for Farmers). कारण, शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. ट्रॅक्टर आणि त्यांचे टायर पार्ट्स, सिंचन आणि शेतीशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी दर 12 आणि 18 टक्के स्लॅबवरून 5 टक्के स्लॅबमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
जीएसटी सुधारणांद्वारे सरकारने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, शेतीशी संबंधित या सर्व उपकरणांवर टॅक्स दर 5 टक्क्यांवर आणल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, शेतात फवारणी केृल्या जाणाऱ्या कीटक नाशकांवरील जीएसटी दरही 12 वरून 5 टक्के करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली.
शेतकऱ्यांना कोण-कोणत्या वस्तूंवर दिलासा मिळाला?
जीएसटी कौन्सिलने शेतीमध्ये वापरल्या जाणारी उपकरणे आणि वस्तू जसे की ट्रॅक्टर, बागायती किंवा वनीकरण यंत्रसामग्री, कापणी किंवा मळणी यंत्रे, गवत कापण्याचे यंत्र, कंपोस्ट खत बनवण्याचे यंत्र इत्यादींवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. याशिवाय, हस्तकला, संगमरवरी आणि ट्रॅव्हर्टाइन ब्लॉक्स, ग्रॅनाइट ब्लॉक्स आणि इंटरमीडिएट लेदर वस्तू यासारख्या श्रम-केंद्रित वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर सरकारने यासंबंधीच्या निर्णयांची माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या जीएसटी सुधारणांमुळे दैनंदिन वापराच्या 90 टक्के वस्तू स्वस्त होतील. अनेक जीवनरक्षक औषधे आणि दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या वस्तूंवरील कर दर शून्यावर आणण्यात आला आहे.