जेएनएन, पुणे, Pune Rain: गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दृष्टीमान कमी झाल्याने अनेक विमानांची उड्डाणे विस्कळीत झाली. दरम्यान 5 विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे तर अनेक विमानाची सेवा उशिराने सुरू आहे.
पावसाच्या तीव्रतेमुळे 5 विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तब्बल 14 विमाने पुण्याऐवजी इतर विमानतळांवर वळवण्यात आले आहेत. याशिवाय काही विलंबाने उड्डाण करत आहेत.
हवामान विभागाने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास हवाई वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता विमानतळ प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, इंडिगो कंपनीची आठ उड्डाणे रद्द तर पाच उड्डाणे उशिराने झाली. इतर विमान कंपन्यांनाही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून विमान कंपन्यांनी पर्यायी व्यवस्था केली आहे. विमानतळावर अन्न-पाणी, आसनव्यवस्था यांची काळजी घेतली जात आहे.
प्रवाशांनी प्रवासाआधी आपल्या उड्डाणाची स्थिती संबंधित विमान कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा हेल्पलाइनवर तपासावी, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.