पुणे. Pune Accident:  पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. शेतमजुरांना नेणाऱ्या पिकअप वाहन आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, शेतमजूर सकाळच्या सुमारास कामासाठी पिकअप वाहनातून जात होते. याच दरम्यान ओतूरजवळील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पिकअपला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.

या अपघातात पिकअपमधील दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील इतर 15 ते 20 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून त्यांना तातडीने ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि काहींना जुन्नर व पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली आहे.

या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, भरधाव वेग आणि चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सतत होत असलेल्या अशा अपघातांमुळे शेतमजुरांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.