World Archery Championships 2025:  सोलापूरच्या गाथा खडके व पुण्याच्या शर्वरी शेंडे या मराठमोळ्या खेळाडूंनी जियानाकुमारच्या साथीने दमदार कामगिरी करत जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावले आहे. कॅनडा येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारतीय मुलींच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकन संघाचा 6-0 असा धुव्वा उडवला. भारतीय मुलींना 18 वर्षांखालील रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदक पटकावण्याची किमया केली आहे. 

कांस्यपदकाच्या लढतीत भारताने आक्रमक खेळ करत अमेरिकेला विजयाची संधीच दिली नाही. 55-53, 59-56, 55-52 अशा गुणांसह 6-0 असा ऐतिहासिक विजय मिळवत भारताने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा. रणजित चामले होते. या संघात सोलापूरच्‍या गाथा खडके, पुण्याच्‍या शर्वरी शेंडेसह चंदीगडच्‍या जियानाकुमार हिचा समावेश होता.

पात्रता फेरीत भारत चौथ्या स्‍थानावर होता. उपउपांत्‍यपूर्व फेरीत मेक्सिको संघाचा 6-0 असा पराभव करीत भारतीय संघाने स्‍पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्‍यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघावर 5-3 अशी मात केली. त्यानंतर भारतीय संघाला उपांत्‍य फेरीत कोरिया संघाने कडवी झुंज देत केवळ एक गुण फरकाने निसटता विजय मिळवला.