स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली. India Vs England Test Series 2025 : लॉर्ड्स स्टेडियमवर पाच दिवस खूपच  रोमांचक ठरलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 22 धावांनी पराभूत केले. या विजयासोबतच इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटीच्या अंतिम दिवशी रविंद्र जडेजाने भारतीय टीमच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या मात्र तो विजय मिळवून देऊ शकला नाही.

रविद्र जडेजा लॉर्डस कसोटीत भारतीय टीमसाठी तारणहार ठरला होता. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांमध्ये 'अभिमन्यु' प्रमाणे लढा देणाऱ्या जडेजाने नाबाद 61 धावांची खेळी केली. जडेजाने इंग्लंडच्या भूमीवर सलग चौथे अर्धशतक करत नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या साथीने खेळ तिसऱ्या सत्रापर्यंत लांबवला. या खेळीने जडेजाच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

जडेजाच्या 7000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण- 

रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात नाबाद 61 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर जडेजाने तिन्ही प्रकारात (टेस्ट, वनडे आणि टी20I) मध्ये मिळून 7018 धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 611 विकेटही आहेत. जडेजा 600 विकेट घेण्याबरोबरच  7 हजार धावा बनवणारा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी माजी कर्णधार कपिल देव यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्या नावावर 687 विकेट आणि 9031 धावांची नोंद आहे.

73 वर्षानंतर लॉर्ड्सवर इतिहासाची पुनरावृत्ती -

नाबाद 61 धावांची खेळी करत रविंद्र जडेजाने लॉर्ड्स टेस्टमध्ये नवा इतिहास रचला. जडेजा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने  लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतके ठोकली आहेत. जडेजाच्या आधी 1952 मध्ये विनू मांकड यांनी पहिल्या डावात 72 आणि दुसऱ्या डावात 184 धावा केल्या होत्या. त्या दोघांशिवाय अन्य कोणताही भारतीय फलंदाज लॉर्ड्सवर दोन्ही डावात 50 च्या वर धावा करू शकलेला नाही.

    इंग्लंडविरुद्ध सलग चार अर्धशतके -

    जडेजाने एका कसोटी मालिकेत सलग चार फिफ्टी केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात जडेजाने बर्मिंघम टेस्ट सामन्यात दोन्ही डावात 89 आणि  69 धावांची खेळी केली होती. लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 72 तर दुसऱ्या डावात नाबाद 61 धावांची खेळी केली. जडेजा इंग्लंडमध्ये सलग  4 अर्धशतके ठोकणारा भारताचा तिसरा कसोटी खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी ऋषभ पंत आणि सौरव गांगुली यांनी अशी कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने 2021 आणि 2025 च्या इंग्लंड दौऱ्यात  मिळून सलग पाच कसोटी अर्धशतके झळकावली आहेत. तर 2002 मध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने इंग्लंडविरुद्ध सलग चार अर्धशतक केली होती.