नवी दिल्ली - Rohit -Virat : टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. हा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शुभमन गिल या मालिकेतून त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाची सुरुवात करेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आले आहे, तर कर्णधारपदाची सुत्रे शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहेत.

टीम इंडियाच्या संघाची पहिली तुकडी 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. बीसीसीआयने आता यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये शुभमन गिल रोहित शर्माला भेटताना दिसत आहे. कर्णधार झाल्यानंतर गिलची रोहित शर्माशी ही पहिलीच भेट आहे.

RO-KO चे ग्रँड री-युनियन

भारताचा एकदिवसीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाला. हॉटेलमधून विमानतळाकडे जाताना, रोहित शर्मा बसमध्ये विराट कोहलीला भेटला. व्हिडिओमध्ये रोहित बसच्या बाहेरून हसत आणि कोहलीला अभिवादन करताना दिसत आहे, त्यानंतर तो बसमध्ये चढतो आणि दोघे एकमेकांना कडकडून मिठी मारतात. हे दृश्य चाहत्यांसाठी खास होते कारण मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये हे दोन स्टार खेळाडू पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

रोहितचा विराटला वाकून नमस्कार - 

रोहितला भेटल्यावर गिल काहीतरी कामात व्यस्त होता, पण गिलने त्याच्या पाठीवर हात ठेवताच दोघेही हसले. रोहित शर्माने टीमच्या बसमध्ये कोणालातरी पाहिले आणि वाकून सॅल्यूट केला. ही व्यक्ती कदाचित विराट कोहली असण्याची शक्यता आहे.

    गिल कोहलीलाही भेटला -

    त्यानंतर, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला. व्हिडिओमध्ये, दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानतळावर निघालेल्या टीम बसमध्ये भेटले. गिल बसमध्ये चढला तेव्हा कोहली पुढच्या रांगेत बसला होता. गिलने कोहलीशी हस्तांदोलन केले, त्यानंतर कोहलीने त्याचे कौतुक केले.

    रोहित -विराटने शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता-

    रोहित शर्माने या वर्षाच्या सुरुवातीला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या काळात विराट कोहली देखील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसला. आता, हे दोघे पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसणार आहेत.