Lalbaugcha Raja 2025 Live Darshan: बुधवारपासून (27 ऑगस्ट 2025) महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हा उत्सव 10 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे 27 ऑगस्टला आगमन झाले असून 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्थीदिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील.
10 दिवस सर्वच सार्वजनिक गणेश मंडळात गणेश दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते. त्यात लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja ) शान तर काही औरच असते. लालबागच्या राजाचे केवळ मुख दर्शनासाठी 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांब रांग लागलेली असते तर दर्शनासाठी 2-2 दिवस रांगेत थांबावे लागते. मात्र आम्ही तुम्हाला लालबागच्या राजाचं घरबसल्या लाईव्ह दर्शन घडवणार आहोत. लालबागच्या राजासोबतच मुंबईतील सर्वात जुना मुंबईचा राजा तसेच चिंचपोकळीचा चिंतामणी आणि पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे घरबसल्या दर्शन घेता येणार आहे.
लालबागचा राजा (Lalbag Cha Raja)-
लालबागच्या राजाचं मनमोहक व विलोभनीय रुप पाहण्यासाठी देशभरातील भाविक आतुर झालेले असतात. याची देही याची डोळा लालबागच्या राजाचे रुप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक कोणतेही कष्ट घ्यायला तयार असतात. कारण राजाच्या केवळ दर्शनाने आपली सर्व विघ्ने दूर होणार असल्याची खात्री भक्तांना असते. अशा लालबागच्या राजाचे डोळेभरुन रुप पाहण्याची संधी इंटरनेट धारकांना मिळणार आहे.
लालबागचा राजा मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईतील परळ परिसरात असलेल्या लालबागच्या राजाला विशेष महत्त्व आहे. भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागचा राजाची सर्वदूर ख्याती आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. अनेक उद्योगपती, राजकीय नेते आणि चित्रपटातील तारे-तारकांची मांदियाळी लालबागचा राजाच्या दरबारात लागलेली असते. सामान्य भक्तांना लालबागचा राजाचे दर्शन घेणे सोपे नाही. अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर भक्तांना बाप्पाची काही सेंकदांची झलक दिसते. मात्र भलीमोठी रांग पाहून अनेक जण दर्शनाला जाण्याचा बेत रद्द करतात. अशा लोकांना आता घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे.
मुंबईचा राजा -
लालबागमधील गणेश गल्ली येथे असणारे लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, जे मुंबईचा राजा (Mumbai Cha Raja) म्हणून प्रसिद्ध आहे. या मंडळाची स्थापना 1928 मध्ये झाली, असून मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक असे मंडळ म्हणजे मुंबईचा राजा.. तसं पाहिलं तर मुंबईचा राजा हा शहरातील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजापेक्षाही जुना आहे, लालबागच्या राजाची स्थापना 1934 मध्ये झाली होती. 22 फूट उंचीची ही प्रतिष्ठित मूर्ती पूर्णपणे हाताने बनवली जाते. कोणत्याही साच्याचा वापर न करता. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत बाप्पाचं घ्या दर्शन..!
देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ असा नावलौकिक असलेल्या मुंबईतील जीएसबी गणेश मंडळाने यंदा तब्बल 474 कोटी रुपयांचा विमा काढला आहे. या विमा कव्हरमध्ये सोने-चांदीचे दागिने, मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी आणि कर्मचारी आणि भाविकांचाही समावेश आहे.जीएसबी सेवा मंडळाने यावर्षी पाच दिवसांच्या गणपती उत्सवासाठी तब्बल 474.46 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. मंडळाची गणेश मूर्ती 69 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने, 336 किलोपेक्षा जास्त चांदी आणि भक्तांनी दान केलेल्या इतर मौल्यवान वस्तूंनी सजवलेली आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी -
चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईतील प्रसिद्ध मंडळांपैकी एक आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1920 साली. आज मंडळाला 105 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 105 वर्षाच्या कालावधीत मंडळाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतील दुसरे सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती -
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना 1893 साली झाली होती. 2025 मध्ये मंडळाला 133 वर्षे पूर्ण झाली. पुण्यातील गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध असून पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे भक्त देखील मोठ्या संख्येने आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरातून देखाव्याच्या ठिकाणी नेण्यात येते. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा देखावा केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पाहा व्हिडिओ