जेएनएन, नवी दिल्ली: Shardiya Navratri 2026: वैदिक पंचांगानुसार, 11 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला खास महत्त्व आहे. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रात संपूर्ण देशभरात आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते. नवरात्राची दुसरी माळ असून, दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महती, मंत्र, महत्त्व यांविषयी जाणून घेऊया…

शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची पूजा केली जाते.  

कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.

कोण आहे देवी ब्रम्हचारिणी? (Goddess Bramhacharini)

पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली. त्यांच्या या तपस्वी स्वरूपाला देवी ब्रह्मचारिणी असे संबोधले जाते. देवीच्या एका हातात जपमाळ, तर दुसऱ्या हातात कमंडलू असतो. देवीचे हे स्वरूप आत्मसंयम, साधना, धैर्य आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचा संदेश देते. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीची आराधना केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

देवी ब्रह्मचारिणीचा मंत्र

    देवीच्या पूजेदरम्यान पुढील मंत्राचा जप केला जातो.

    ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥

    या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
    दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
    देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

    आजचा शुभ रंग कोणता?

    दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे ब्रह्मचारिणी हे रूप पुजले जाते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. या देवीचा आवडता रंग पांढरा. पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. ह्या दिवशी पांढरा, फिकट पाढंरा, पिंगट रंगाची वस्त्रे परिधान करतात.