Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाचे पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो. दारासमोर रांगोळी घालून अशी तयार केलेली गुढी उभी केली जाते.
या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळूनहा प्रसाद तयार केला जातो.
तसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते. याचे भक्षण केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात. शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. म्हणून केवळ या दिवशी कडुनिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहे.
कडुलिंबचा आरोग्यविषयक महत्व -
कडुलिंब जंतूनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून सेवन करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, त्वचा रोग बरे होतात, धान्यातील कीड नियंत्रित करता येत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानले जाते.
पाडव्याचे कृषीविषयक महत्व –
नवीन पिकांची लागवड व नववर्ष यामुळे गुढीपाडव्यास कृषी संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचे गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक हिंदू सण आहे. असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक सांगतात.
हे ही वाचा -Gudi Padwa 2026: गुढी उभी करताना ही चूक कधीही करू नका, वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व -
- गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक(बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.
- नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.
- असे मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे.
- राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.
उलट्या तांब्याचे महत्व –
सर्व ऋतुंमध्ये वंसत मीच आहे असे भगवान गीतेत सांगतात, वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने रज, तम गुण कमी होतात व सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रम्हांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षिक करतो. तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी घरात प्रवेश करतात.
हे ही वाचा -Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाची सुरूवात कडूलिंबाची पाने खाऊन का करतात? काय आहे यामागील रहस्य
गुढीपाडव्याला गुढीचे महत्व व शास्त्रोक्त विधी -
गुढी पाडव्याला गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल ते सर्व करता येते. गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे, तांब्याचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.
