जेएनएन, नवी दिल्ली. Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले महाराष्ट्राचे आराध्यदैवत पांडुंरंगाच्या दर्शनासाठी वारकरी पायी पंढरपुरात दाखल होत आहेत. शनिवारी 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपुरात (Pandharpur Wari 2025) दाखल होत आहेत.
संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अन्य संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करताच व जसजशी आषाढी एकादशी जवळ येते तसे वातावरण भक्तीमय व विठ्ठलमय होते.यावेळी महाराष्ट्रातील घराघरातून ऐकू येणारे गीत म्हणजे निराकार तो निर्गुण ईश्वर,जसा प्रकटला अला विटेवर, उभय ठेविले हात कटीवर,पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा.
याबरोबरच ज्ञानेश्वर माऊलींनी कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू, अशा शब्दात आपली विठू भक्ती प्रकट केली. त्यांच्या ओवीत कानडा व कर्नाटक हे दोन शब्द आढळून येतात.नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी असा उल्लेख केला आहे. ग.दी माडगुळकर यांनीही कानडा राजा पंढरीचा असं वर्णन गीतात केलं आहे. या शब्दांचा अर्थ जाणून घेऊया..
अभ्यासकांच्या मते कानडा या शब्दाचा अर्थ गूढ,अगम्य तर कर्नाटकु या शब्दाचा अर्थ लीला दाखवणारा असा आहे. तर काहींच्या मते विठ्ठल मूळचा कर्नाटकचा असल्याने त्याला कानडा म्हटले जाते. कर्नाटकातील हंपी येथे भव्य विठ्ठल मंदिर आहे तेथून मूर्ती पंढरपुरात आणली गेली अशी आख्यायिका सांगितली जाते.
काय आहे आख्यायिका -
महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व शस्त्रे ठेऊन विश्रांती घेण्यासाठी कर्नाटकात हंपी येथे आले व तेथून भक्त पुंडलिकाची भेट घेण्यासाठी पंढरपुरात आले.भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने वीट पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतिक्षा करण्यास सांगितले. त्यानुसार भक्ताच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे.
हंपी येथे पुरातन विठ्ठल मंदिरे आहेत परंतु त्यात विठ्ठलाची मूर्ती नाही.असे सांगितले जाते की विठ्ठलाने राजा कृष्णदेवराय यांच्या स्वप्नांमध्ये येऊन त्यांना आपली मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला स्थापन करण्यास सांगितले. त्याचबरोबर हंपीतील विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं पंढरपुरात आणून सुरुक्षित ठिकाणी ठेवला गेला, अशीही एक दंतकथा सांगितली जाते. त्याचबरोबर हंपीच्या राजाने पंढरपुरची मूर्ती आपल्याबरोबर नेली.
त्यानंतर पंढरपुरातील भक्त विठ्ठलाच्या ओढीने हंपीला गेला. त्यानंतर विठ्ठल त्याच्याबरोबर पुन्हा पंढरपुरात आला व कायमचा विराजमान झाल्याचेही सांगतले जाते. मूळचा कर्नाटकचा असल्याने कानडा राजा पंढरीचा, अशी अभंगा रचना अनेक संतानी केली.
हंपीमध्ये साजरा होतोय विठ्ठल विवाह सोहळा -
कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तिरावर हंपी हे ऐतिहासिक महत्व असलेले शहर वसलेले आहे. हे स्थान विरुपाक्ष मंदिर,विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठीही प्रसिद्ध आहे.यातील एका रथाचा फोटो 50 रुपयांच्या नोटेवरही छापला गेला आहे.
हंपी येथे 16 व्या शतकात बांधलेले विठ्ठल मंदिर आहे. त्याच बरोबर शहरात वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेली अनेक विठ्ठल मंदिरे आहेत. हंपीतील विठ्ठल मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरातून गायब असलेली विठ्ठलाची मूर्ती अन् मंदिराच्या प्रांगणात असलेला भव्य दगडी रथ. दरवर्षी डिसेंबरमध्ये या मंदिरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत विठ्ठलाचा विवाह सोहळा साजरा केला जातो.