नवी दिल्ली - महाराष्ट्र मंडळ मयूर विहारमधील सार्वजनिक गणेश मंडळाकडून उत्साहपूर्ण वातावरण गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी विविध गुण दर्शन कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये मुलांनी वैविध्यपूर्ण कलागुणांचे सादरीकरण केले.  

बाप्पाच्या आरतीनंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वात लहान कलाकार 7 वर्षांचा वरद मोहरीकर याने आपली नृत्यकला सादर केली. त्याने देवा श्री गणेशा या गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. त्यानंतर, आमच्या सर्वात वयस्कर सहभागी, 81 वर्षीय डॉ. सुलभा कोराने यांनी एक नाट्य सादर केले, ज्यात पारंपारिक सासू काळाच्या बरोबरीने कसे आधुनिक सासूमध्ये रूपांतरित होते, याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

8 वर्षांच्या समर्थ अलवाडी या मुलाने गणेश वंदनेवर नृत्य केले आणि त्यानंतर निष्ठा आणि सान्वी द्विवेदी यांनी रामरक्षा स्तोत्राचे पठण केले. चिल्ला येथील सरकारी शाळेतील नववीतील विद्यार्थी शिवांगने जय देव जय देव या गाण्यावर शास्त्रीय नृत्य सादर केले, त्यानंतर अलिशा गोडबोले (11 वर्ष) हिने इंग्रजी गाणे गाणून सर्वांची वाहवा मिळवली. 

चिल्ला येथील सरकारी शाळेतील सातवीच्या चार विद्यार्थ्यांनी माता तुळजा भवानी (दुर्गा) ला प्रसन्न करणारे "गोंधळ" हे एक उत्साहवर्धक, ऊर्जावान नृत्य सादर केले. या गीतानंतर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्यानंतर "समर्पण" संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कथ्थकचे सादरीकरण केले. साक्षी शुक्ला, अनुश्रुता बर्दन आणि सरक्षी गुप्ता यांनी गयये गणपती जग वंदन या गाण्यावर सुंदर नृत्य केले. त्यांना मयूर विहारमध्ये कथ्थक वर्ग चालवणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक गुरु ज्योत्स्ना बॅनर्जी शुक्ला यांनी प्रशिक्षण दिले. सर्व सहभागींना भेटवस्तू देण्यात आल्या आणि मोठ्यांना आणि गुरुंना फुलांचे गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्र मंडळ मयूर विहारकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मंडळाचे 38 वे वर्ष असून यंदा चार दिवस  चालणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

    महाराष्ट्र मंडळ मयूर विहारमार्फत 27, 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी आयसीआयसीआय बँक, मयूर विहार फेज-1, दिल्ली-110091 जवळील गर्ग सेलिब्रेशन हॉल, आर्चार्य निकेतन मार्केट येथे गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.