मुंबई. Devendra Fadnavis and Ajit Pawar Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (22 जुलै) वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देताना लिहिलेल्या शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Birthday) हे आज 56 व्या वयात पदार्पण करत आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar Birthday) वयाच्या 67व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

 विश्वासाचा हात असू दे, 

मैत्रीचा सहवास असू दे, 

महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे

    महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा! 

    त्याचबरोबर शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

    वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा..

    अजित पवारांना शुभेच्छा देताना शिंदे यांनी म्हटले की, महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना!

    अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ११ एकर क्षेत्रात पोट्रेट-

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यातील मलाराणा मतदारसंघात सुमारे ११ एकर जागेवर त्यांचे चित्र असलेली कृषी कलाकृती तयार करण्यात आली आहे.