नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सत्ताधारी आघाडीचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले आहेत, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. संसदीय कामकाज मंत्री म्हणाले की, हा एकमताने घेतलेला निर्णय आहे.
NDA नेत्यांनी घेतली बैठक
संसद संकुलात भाजपच्या प्रमुख नेत्यांची आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नड्डा यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा, जेडीयूचे लल्लन सिंग, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, टीडीपीचे लवू श्रीकृष्ण देवरायलू आणि लोजपचे (रामविलास) चिराग पासवान यांनीही बैठकीला हजेरी लावली. राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
9 सप्टेंबर रोजी होणार मतदान
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या पदाच्या निवडणूक वेळापत्रकाबाबत अधिसूचना जारी केली आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच, आजपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून 21 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 च्या कलम 4 च्या उपकलम (4) आणि (1) अंतर्गत एक अधिसूचना जारी केली आहे.