भुवनेश्वर: Maoists Encounter : बुधवारी रात्री उशिरा बेलघर पोलिस स्टेशन हद्दीतील गुम्मा जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह सहा माओवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. गणेश उईके हा ओडिशाचा एक प्रमुख माओवादी नेता होता. त्याच्यावर 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

त्यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी चकमकीच्या ठिकाणाजवळ दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या एसओजी (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) च्या एका छोट्या मोबाईल टीमने जंगलात शोध मोहीम सुरू केली, तेव्हा त्यांना माओवाद्यांचा सामना करावा लागला.

गणेश उईके चकमकीत ठार-

त्यांनी सांगितले की, चकमकीत जोरदार गोळीबार झाला आणि त्यात माओवादी ठार झाले. दोन पुरुष कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडले, तर आणखी एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह काही अंतरावर आढळला. पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, एक रायफल आणि एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला.

    या चकमकीत सुरक्षा दलाच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशाचे डीजीपी वाय.बी. खुराणा यांच्यासमोर 22 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही चकमक घडली.