नवी दिल्ली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने बंडखोरी रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची एकनिष्ठता तपासण्यासाठी आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्ष बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिल्याने एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाने 'थ्री-लाइन व्हिप' जारी करूनही सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या बैठकीला संजय राऊतांसह केवळ 3 खासदार उपस्थित राहिल्याने तर उर्वरित 6 बंडखोर खासदारांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले.
ठाकरे गटाच्या या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात होते. मात्र या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट काय रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली जाऊ शकते.
बैठकीसाठी कोण-कोण हजर
संजय राऊत (राज्यसभा खासदार)
अनिल देसाई (मुख्य प्रतोद)
अरविंद सावंत (लोकसभेतील गटनेते)
राजाभाऊ वाजे (नाशिकचे खासदार)
बैठकीसाठी कोण गैरहजर -
1. ओमराजे निंबाळकर
2. संजय दिना पाटील
3. संजय जाधव
4. संजय देशमुख
5. नागेश पाटील आष्टीकर
6. भाऊसाहेब वाकचौरे
बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला कायदेशीर कचाट्यात पकडण्यासाठी ठाकरे गटाने सर्व 9 खासदारांना 'थ्री-लाइन व्हिप' जारी करून वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे कडक आदेश दिले होते. आता या व्हिपचे उल्लंघन करून 6 खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे ठाकरे गट त्यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई करण्याची कायदेशीर नोटीस बजावू शकते.
व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई -अरविंद सावंत
नवी दिल्लीत होणाऱ्या शिवसेना (यूबीटी) खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर आणि बंडाच्या वाढत्या अटकळींच्या दरम्यान, पक्षनेते अरविंद सावंत यांनी गुरुवारी सांगितले की, पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शिवसेना (यूबीटी) चे राज्यसभा सदस्य संजय राऊत म्हणाले की, बंडखोरांना 'धडा शिकवण्याची गरज आहे'. वाढत्या संकटकाळात, बंडखोर शिवसेना (यूबीटी) नेत्यांच्या एका गटाने बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अनौपचारिक भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याने व्हीप जारी करण्यात आला. व्हिप सर्व खासदारांपर्यंत पोहोचला आहे. ते त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे, ईमेल केले आहे आणि व्हॉट्सॲपवरही पाठवले आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. "पक्षप्रमुखांशी (उद्धव ठाकरे) सल्लामसलत केल्यानंतर व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सावंत म्हणाले. राऊत म्हणाले की, ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना बोलावले होते, त्यावेळी गद्दारी करणाऱ्यांना सोडू नये आणि पक्षाला दगा देणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात काय करावे, यावर चर्चा झाली. शिवसेना (यूबीटी) नेते पुढे म्हणाले की, पवारांनी त्यांना सांगितले की ते त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घ्याव्यात. सावंत म्हणाले की, दिवंगत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी तर पक्ष बदलणाऱ्या खासदार आणि आमदारांना ठोकून काढण्याची सूचनाही केली होती.
