मुंबई. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्थात UBT पक्षातील काही खासदार सत्ताधारी शिवसेनेत सहभागी होण्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आज संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.पक्षातील नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा ते सात खासदार स्वतंत्र गट स्थापन करून सत्ताधारी शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या घडामोडींमुळे पक्ष नेतृत्व सतर्क झाले असून संभाव्य फुट रोखण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील पक्षनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी बुधवारी सर्व खासदारांना तीन ओळींचा पक्षादेश (व्हिप) जारी केला आहे. या व्हिपनुसार सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, आजच्या बैठकीत जे खासदार उपस्थित राहतील ते पक्षासोबत असल्याचे मानले जाईल. त्यामुळे बैठकीतील उपस्थितीवरून कोण पक्षाशी निष्ठावंत आहे आणि कोण बंडखोरीच्या भूमिकेत आहे, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत संसदीय दलाची (Parliamentary Party Meeting) तातडीची बैठक बोलावली आहे. शिंदे गटासोबत 6 खासदार गेल्याचा दावा केला जात असला, तरी लोकसभा अध्यक्ष (Speaker) ओम बिर्ला यांच्याकडे दिलेल्या पत्रात 6 पैकी 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. 

कोणत्या खासदारांबाबत चर्चा?

UBT कडे सध्या लोकसभेत नऊ खासदार आहेत. यामध्ये अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई, राजन विचारे यांच्यासह इतर खासदारांचा समावेश आहे. काही खासदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

    ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई

    लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर UBT मध्ये संभाव्य फुटीच्या चर्चेमुळे पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर खासदारांची एकजूट कायम ठेवणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

    बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

    आजच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, कोण अनुपस्थित राहतात आणि बैठकीनंतर पक्ष नेतृत्व काय भूमिका जाहीर करते, यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे UBT मधील कथित बंडखोरीच्या चर्चांना आजच्या बैठकीनंतर अधिक स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता आहे.